गरीबी व श्रीमंती कर्तृत्वाशी संबंधित नसून सिस्टीमशी संबंधित आहे!
गरीबी व श्रीमंती कर्तृत्वाशी संबंधित नसून सिस्टीमशी संबंधित आहे!
आपल्या देशातील गरिबीची कारणे ‘दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं’ या सदरात येणारी आहेत. या कारणांचा विचार करता गरिबी म्हणजे कर्तृत्वशून्यता नाही आणि श्रीमंती म्हणजे कर्तृत्वसंपन्नता नाही हे सिद्ध होते. सदोष अर्थ वितरण प्रणाली हेच आपल्या देशातील गरिबीचे प्रमुख कारण आहे.
आपल्या देशात ज्यांचे काम खरी देशसेवा आहे त्यांना अत्यल्प पैसा मिळतो. याउलट ज्यांचे काम प्रत्यक्षात देशद्रोह आहे त्यांना मात्र प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो. देश जेवढा करदात्यांच्या करांवर चालतो त्याहीपेक्षा अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या शोषलेल्या रक्तावर चालतो हे जळजळीत वास्तव आहे.
जो जास्त पैसा कमावतो तो कर्तृत्ववान अशी जी भारतीय मानसिकता झालेली आहे ती अतिशय हीन दर्जाची आहे. खरंतर ज्याच्या कामामुळे देशाची जास्तीत जास्त उन्नती होते तो खरा कर्तृत्ववान ही कर्तृत्वाची खरी व्याख्या आहे.
उदाहरणार्थ शेतकरी शेती पिकवतो त्यामुळे सर्वांना खायला अन्न मिळते आणि सर्व जगू शकतात. त्यामुळे खरंतर शेतकरी हा जास्त कर्तृत्ववान आहे; पण त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. तो गरीब राहतो आणि त्यामुळे त्याला कर्तृत्वशून्य समजले जाते.
याउलट अंमली पदार्थ, दारू, गुटखा इत्यादी विकणारे लोक हे कोट्याधीश आहेत. खरंतर त्यांच्या मालामुळे लोकांच्या जीवनाचा सत्यानाश होतो; म्हणजे त्यांचं काम खरंतर देशद्रोह आहे. तरीदेखील त्यांच्याकडे पैसा जास्त असल्यामुळे त्यांना कर्तृत्वसंपन्न समजलं जातं.
हे सडक्या मानसिकतेचं लक्षण आहे. गलेलठ्ठ पगार घेऊन अप्रामाणिकपणे काम करणारे भ्रष्टाचारी अधिकारी, पुढारी हे देखील फुकटखाऊच आहेत.
फुकट रेशन व अन्य सवलती गरिबांची गरज आहे. त्यांच्या कामाला योग्य दाम दिले तर त्यांना या फुकट योजनांची गरजच उरणार नाही.
गरिबांना फुकट वाटलं तर ज्यांना त्रास होतो त्यांना हे हरामखोर, लुटारू, भ्रष्टाचारी श्रीमंत फुकटखाऊ का दिसत नाहीत? याचं खेद वाटतो.
✳ पैसा कुणाला आणि का मिळतो?
काही क्षेत्रांमध्ये भरमसाठ पैसा मिळतो याला कारण म्हणजे व्यवस्था. पैसा जास्त मिळतो म्हणजे त्या क्षेत्रातील काम फार देशोपयोगी आहे असे नाही.
उदाहरणार्थ – चित्रपट कलावंत vs. शेतकरी
- चित्रपट कलाकार लाखो-कोटी रुपये मिळवतात कारण लोकसंख्या जास्त, व्यावसायिक उलाढाल जास्त.
- त्यांनी काम बंद केलं तरी लोक मरणार नाहीत, फक्त मनोरंजन थांबेल.
- शेतकरी-शेतमजूर अन्न पिकवतात – जर त्यांनी काम बंद केलं तर अनान्न दशा होईल.
- कंत्राटी कामगार, कष्टकरी जीवनोपयोगी वस्तू तयार करतात – त्यांचं काम बंद झालं तर देश ठप्प होईल.
म्हणून महत्त्वाचं काम = जास्त दाम असा निकष हवा आहे. पण आज असं होत नाही. म्हणूनच महत्त्वाचे काम करणारे गरीब राहतात आणि थोडेसे उपयुक्त पण प्रसिद्धी लाभलेले लोक श्रीमंत होतात.
✅ उपाय : आदर्श अर्थवाटप प्रणाली
हे चित्र बदलायचं असेल तर न्याय्य आणि आदर्श अर्थ वितरण प्रणाली विकसित करून प्रत्येकाच्या कामाला योग्य दाम द्यावे लागतील.
अशी अर्थव्यवस्था विकसित झाली, तरच देशातील गरिबी नक्कीच दूर होईल.
वरील उदाहरण फक्त मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आहे. कलावंतांबद्दल आम्हाला आदर आहे.
– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता,
आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ
Labels: सामाजिक न्याय