✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश
- Get link
- X
- Other Apps
✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला
लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश
पुरचाऱ्यांच्या माध्यमातून सिन्नरच्या पूर्वेकडील दुष्काळी भागात अखेर गंगा अवतीर्ण झाली. झुळझुळ वाहणाऱ्या जलधारांनी भूमी पावन झाली. मातीचा कण नि कण आणि त्या मातीवरील मन नि मन रोमांचित झाले. कित्येक दशकांपासूनच्या जनसामान्यांच्या आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश आले. वाहणाऱ्या प्रत्येक जलधारेत रक्ताभिषेकात ओघळलेल्या त्यागाच्या थेंबांची अनुभूती आली. २२ वर्षांपूर्वीचा तो संपूर्ण घटनाक्रम कालचक्राने उलट दिशा घेऊन जसाच्या तसा डोळ्यांसमोर अवतीर्ण केला. ते मंतरलेले दिवस आठवले आणि डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.
संघर्षाचा इतिहास आणि साक्षीदार पिढी
खरे तर सिन्नरच्या पूर्व भागाचा दुष्काळ मिटवण्यासाठी १९७२ सालापासून अनेक दिग्गजांसह सर्वसामान्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. याच जल संघर्षातून झालेली सिन्नरची दंगल, त्या दंगलीत पेटवले गेलेले न्यायालय या सर्व घटनांना आज या जलधारा स्मृतिधारांच्या रूपात प्रवाहित करत आहेत. तशी आमची पिढी ही ८० च्या दशकातली. पण इसवी सन २००२ च्या उत्तरार्धात आमच्या पिढीकडून सुरू झालेल्या जल आंदोलनामुळे तत्कालीन अनेक बुजुर्गांचा, त्या आंदोलनांमध्ये सहभाग घेतलेल्या जुन्या जाणत्या आंदोलकांचा अगदी जवळून संपर्क आला आणि जल आंदोलनाचा आमच्या आधीचा इतिहास देखील संपूर्णपणे ज्ञात झाला. पाणी प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लावण्यात यशस्वी झालेल्या सध्याच्या विद्यमान लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचे अभूतपूर्व योगदान आपल्याला नक्कीच कधीही विसरता येणार नाही. पण त्यांचे स्मरण ठेवत असतानाच, ऋण व्यक्त करत असतानाच यापूर्वीच्या लढ्यांना आणि लढवय्यांना देखील आपल्याला विसरून चालणार नाही. तो त्यांच्यावर घोर अन्याय ठरेल.
शिवपिंडीवरील रक्ताभिषेक – संघर्षाचे प्रतिक
मला आजही २००२ च्या उत्तरार्धातील तो क्रांतिकारी दिवस, नव्हे नव्हे ती क्रांतीकारी रात्र जशीच्या तशी आठवते. रात्रीचे साधारणतः नऊ वाजलेले असतील. माझ्या मळ्यात, चांदण्यांच्या शीतल प्रकाशात मी एकटाच एकांतात निसर्गाचा आनंद घेत चिंतन करत बसलो होतो. तेवढ्यात माझे मित्र कैलासवासी नारायण तुकाराम पगार आणि श्री. अण्णासाहेब जयराम निरगुडे मला येऊन भेटले. पाणी प्रश्नावर विधायक विचारविनिमयासाठी ते माझ्याकडे आले होते. नारायणने हळूच विषयाला हात घातला. अण्णाच्या मनातील तळमळ नारायणने त्याच्या शब्दात माझ्यापुढे व्यक्त केली. विषय अर्थातच पाणी प्रश्नाचा होता. त्या रात्री बराच वेळ आम्हा त्रयींमध्ये सखोल विचार मंथन झाले आणि त्याच क्षणी आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले. दुसऱ्याच दिवशी गावातील अन्य मित्रांना, बुजुर्गांना जमवून बैठकीचे आयोजन केले गेले. आंदोलनाची दिशा ठरवली गेली. आंदोलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी दररोज पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या जाऊ लागल्या. आंदोलनासाठी निधी उभारला जाऊ लागला. शेतकरी विकास संघर्ष समितीची स्थापना झाली. एक दिवस सर्वजण ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना त्यांच्या राळेगणसिद्धी या गावी जाऊन भेटलो. अण्णांनी अनमोल मार्गदर्शन केले. अण्णांकडून प्रेरणा घेऊन गावी परतलो. अनेक उत्साही युवक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊ लागले. जुन्या आंदोलनांतील पाणी प्रश्नावरील उपायांची जाण असलेले अनुभवी वयोवृद्ध आंम्हाला मार्गदर्शन करू लागले. आंदोलनाला धार देण्यासाठी उत्साही कार्यकर्त्यांनी शिव पिंडीवर रक्ताभिषेक करून शिवशंभो शंकराला आवाहन करण्याचा निर्धार केला. संजय कलकत्ते हा मित्र नवीन धारदार पाते लावलेला वस्तरा घेऊन आला. शनी मंदिराच्या समोर असलेल्या शिव पिंडीभोवती सर्वजण जमले. शिव पिंडीवर डाव्या हाताची तर्जनी ठेवून, डोळे झाकून, “हर हर महादेव” अशी गर्जना करत, मनोमन देवाधि देवा महादेवा, आमचा पाणी प्रश्न सोडव. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला बळ दे! अशी प्रार्थना करत खटाखट तर्जनीवर वस्तऱ्याचे वार केले गेले. रक्ताच्या धारांनी शिवपिंड न्हाऊन निघाली. अर्थात समाज या ध्येयवेड्या युवकांचा काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला हा इतिहास अल्पावधीत विसरला असला तरी रक्ताच्या त्या वेदनामय धारांनी जलधारांचे ते ‘वेडे सुखस्वप्न’ आंम्हा युवकांना कधीच विसरू दिले नाही.
जनआंदोलनाची राजधानी मुंबई
१ मे २००३ — महाराष्ट्र दिनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू झाले. भुकेने, तहानेने व्याकुळ झालेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत जिद्दीचा ज्वालामुखी धगधगत होता. उत्साहाच्या भरात अनेक युवकांनी उपोषणासाठी नावे तर दिली पण उपोषणाचा त्रास सहन होईना. आणा-शपथा घेऊन आत्मबलाने भक्कम झालेले कट्टर कार्यकर्ते उपोषणाच्या वेदना सहन करत तसेच पडून राहिले. पण काही कार्यकर्त्यांना भूक सहन होईना. अक्षरशः काहींनी संडासमध्ये जाऊन कोरके, पाव खाल्ले. एवढी भीषण अवस्था झाली होती. यथावकाश मंत्रालयातून गाडी आली. आंदोलक-प्रतिनिधींना घेऊन गाडी मंत्रालयात गेली. तत्कालीन पाटबंधारे मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची भेट झाली. त्यांनी पाणी प्रश्न कसा सोडवला जाईल? याविषयीचे पर्याय विचारले. ते अर्थातच अपेक्षित होते. त्यासाठी जुन्या अनुभवी वयोवृद्धांनी आमचा गृहपाठ अगोदरच पक्का करून घेतलेला होता (जे आज हे साकार झालेलं सुखस्वप्न पहायला हयात नाहीत) त्यांनी सुचवलेला रामबाण पर्याय, (जो आजही अर्ध्यातच उतरलेला आहे) तो पर्याय आंम्ही लिखित स्वरूपात मांडला. तो पर्याय असा होता:- बारमाही पाण्यासाठी:- वैतरणा, दारणा, कडवा या क्रमाने धरण प्रकल्पांचे पाणी देव नदीत सोडून चाऱ्यांच्या माध्यमातून ते पूर्व भागात आणावे. आणखी दुसरा पर्याय देखील सुचवलेला होता:- भोजापुर धरणाच्या पाण्यातील सिन्नर तालुक्याचा हिस्सा वाढवावा. मंत्र्यांनी निवेदन घेऊन उपोषण थांबवले. त्यानंतर दोनच दिवसांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते श्री. नारायण राणे यांनी वावी येथे पाणी परिषद घेतली. त्यांनी जनतेला आवाहन केले,” मला पुन्हा मुख्यमंत्री करा. विद्यमान आमदारांना पुन्हा आमदार करा. तुमचा पाणी प्रश्न सुटला म्हणून समजा. आंदोलने करण्याची गरज नाही.”
पाटबंधारे मंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली होती. परंतु लवकरात लवकर पाणी प्रश्न सुटण्यासाठी अधून मधून छोटी मोठी पाठपुरावा आंदोलने सुरू राहणे आवश्यक होते. परंतु लोकांनी साफ सांगितले की पाणी प्रश्न आमदारसाहेब सोडवणार आहेत. आंदोलन करण्याची गरज नाही. लोकांना तेव्हा आंम्ही सांगत होतो की “पाणी प्रश्न तर आमदारसाहेबच सोडवणार आहेत. ते त्यांचेच काम आहे. त्यांना आपण त्यासाठीच निवडून दिलेले आहे. पण पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी त्यांचे हात बळकट करणे आपले काम आहे. जन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढेल आणि आमदारांचे काम सोपे होईल. विरोधी बाकावर बसलेल्या आमदारांना कामे करणे कठीण असते. शिवाय सरकारी पक्षात असले तरी सरकारमध्ये देखील अनेक अंतर्गत विरोधक असतात. तेव्हा जनतेचा रेटा आवश्यक आहे.” पण लोकांनी ऐकले नाही ज्याचा परिणाम म्हणून जे काम जास्तीत जास्त पाच वर्षात व्हायला हवे होते. त्याला वीस वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागली. शिवाय योजना पूर्णतः सत्यात उतरलेली नाही. अर्धवटच आहे. आपल्याला पूर चाऱ्यांवरच भागवून घ्यावे लागलेले आहे. शिवाय लोकवर्गणीतून कामे करावी लागत आहेत. हरकत नाही. ‘पेला अर्धा रिकामा आहे, यापेक्षा पेला अर्धा भरलेला आहे’ हा दृष्टिकोन कधीही योग्य!
अर्थात लोकांनी साथ सोडलेली असली तरी शंभू महादेवांनी आम्हाला कायम साथ दिली. त्यांच्या प्रेरणेतून आंम्ही लढत राहिलो. आमचे पाठपुराव्याचे पत्रव्यवहार सतत सुरू होते. ज्या पत्रांना उत्तर मिळत नव्हते त्या पत्रांचे उत्तर माहिती अधिकारातून मिळवत होतो. लढा सुरू होता महादेवाला स्मरून!
विधानसभेची उमेदवारी: जल आंदोलनाचाच भाग
इसवी सन २००९ मध्ये जल आंदोलनातील युवकांशी विचारविनिमय करून मी विधानसभेची उमेदवारी केली होती. उथळ विचारवंतांना त्या मागील उद्देश समजणे शक्य नव्हते. परंतु प्रस्थापितांना मात्र उमेदवारीची दखल घ्यावीच लागली. कारण अटीतटीच्या लढाईत एक एक मतदान देखील महत्त्वाचे होते. पाणीप्रश्न अधोरेखित झाला. “यापूर्वीची इलेक्शने पाणीप्रश्न सोडवला जाईल या भांडवलावर लढली गेली; पण यानंतरची इलेक्शने मात्र पाणी प्रश्न सोडवून दाखवला या भांडवलावर लढली जातील” असे स्पष्ट संकेत मिळाले.
पाणी प्रश्न प्रदीर्घकाळ प्रलंबित राहण्यामागे जुन्या जाणकारांनी केलेले एक मार्मिक विश्लेषण: अनावश्यक सत्तांतर:-
सिन्नरच्या जनतेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना साथ देण्याऐवजी, नेमके समस्या सुटण्याच्या उंबरठ्यावर असतानाच सत्तेतून खाली खेचले.
सेझ(SEZ) आंदोलनात गाजलेला पाणी प्रश्न
इसवी सन २०१० हे साल सेझ अर्थात special economic zone आंदोलनाने गाजले. जपान कॅरीडॉर या कंपनी प्रकल्पासाठी पूर्व भागातील सर्व जमिनी अधिग्रहित होणार होत्या. आम्ही युवकांनी त्यावेळेस सेझला प्रचंड विरोध केला. दररोज एक गाव याप्रमाणे प्रत्येक गावातील ग्रामस्थांचे आत्मदहनाचे इशारे पत्र रूपाने आम्ही केंद्र शासनाला पोहोचवत होतो. शेवटचा धक्का म्हणून सिन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. सरकारी पक्षाने सेझच्या बाजूने बाजू मांडली,” तुमचा भाग दुष्काळी आहे. पाण्याअभावी शेती पिकत नाही. सेझच्या माध्यमातून तुमच्याकडे उद्योगधंदे येतील. तुमच्या लोकांना कामे मिळतील आणि बेरोजगारी दूर होईल. शिवाय जमिनीच्या मोबदल्यात जो पैसा मिळेल त्या पैशात दुसरीकडे जमिनी विकत घेता येतील.” प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनी केलेला युक्तिवाद- ”उद्योगधंद्यांच्या माध्यमातून लोक वसाहत वाढेल. या लोकवसाहतीसाठी व उद्योग धंद्यांसाठीही अतिरिक्त पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागेल. मग त्याच सिस्टीमने आमच्या शेतीसाठी पाणी द्यावे. शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले तर आमच्या भागातील बेरोजगारी १००% हटेल. तुम्ही आमच्या जमिनी सरकारी भावात घेणार आहात. सरकारी भावात जमिनी फक्त सरकारलाच मिळू शकतात. शेतकऱ्यांना नाही.” हा युक्तिवाद अगदी फिट बसला. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आंम्ही बळजबरीने सेझ लादणार नाही. अशी ग्वाही देत सरकारने आंदोलन थांबवले. त्यावेळी सेझ प्रकल्प लागू करण्यासाठी लोकप्रतिनिधी अनुकूल होते. हरकत नाही.
अखेर गंगा अवतीर्ण झाली
अखेर शंभो महादेवाने या भूमीच्या आर्तनादाला प्रतिसाद दिला. जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा हा सामूहिक संघर्ष अखेर पवित्र फलिताला पोहोचला. रक्तातून उगवलेली ही जलधारा आज सिन्नरच्या भूमीला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही.
भगवान के घर देर है; अंधेर नही!
या भूमीच्या संघर्षाचा प्रत्येक थेंब अखेर जलधारेत विलीन झाला — आणि हीच खरी पावनता आहे.
सर्व हयात आणि दिवंगत कार्यकर्त्यांना, तसेच आजही पाण्याच्या प्रवाहासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्वांना —
मनःपूर्वक वंदन!
आपला अरुण रामचंद्र पांगारकर
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
✊ आपले विचार खाली नोंदवा. श्रमिकांच्या हक्कासाठी एक विधायक विचारही परिवर्तन घडवू शकतो. सभ्य आणि विचारशील प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
✊ अपने विचार नीचे दर्ज करें। श्रमिकों के अधिकारों के लिए आपका एक सकारात्मक विचार भी परिवर्तन ला सकता है। शालीन और रचनात्मक टिप्पणियों का स्वागत है।
✊ Share your thoughts below. Even a single constructive idea can bring change for workers’ rights. Respectful and meaningful comments are always welcome.