गरीबी, श्रीमंती व कर्तृत्व
गरीबी, श्रीमंती व कर्तृत्व सच्च्या देशसेवेला न्याय देणारी आदर्श अर्थ वितरण प्रणाली हाच गरिबी हटवण्याचा एकमेव उपाय आहे. देशातील गरिबी व श्रीमंती माणसाच्या कर्तृत्वाशी संबंधित नसून सदोष अर्थ वितरण प्रणालीशी संबंधित आहे हे स्पष्ट आहे. मुळात पैसा ही निसर्गनिर्मित वस्तू नसून मानवनिर्मित वस्तू आहे. पैसा हे फक्त विनियोगाचे साधन आहे. माणसा-माणसांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण सुलभ करण्याचे ते फक्त एक साधन आहे ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. पैसा हे जीवन जगण्याचे माध्यम आहे, साधन नाही. पैशांच्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार हेच भ्रष्टाचाराचे मूळ असून भ्रष्टाचारामुळेच गरिबी व श्रीमंतीचा उदय झाला आहे. आज देशात खरे देशसेवक उपाशी आणि देशद्रोही तुपाशी अशी जी माणुसकीला काळीमा फासणारी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला कारण हा पैसाच आहे. माणसाचे कर्तृत्व पैशात मोजले जावे याच्यासारखी नीच गोष्ट दुसरी कोणतीही नाही. मुळात पैसा हा कर्तृत्वात मोजला जायला हवा; पण तसे होत नाही. ज्यांचे काम खरी देशसेवा आहे, ज्यांच्या कामाचा देशाला उपयोग होतो, ज्यांच्या कामामुळे देशाची प्रगती होते, ज्यांच्या कामात खऱ्या अर्थाने श...