भारतातील श्रीमंती म्हणजे अभ्यास न करता कॉपी करून पास झाल्याचा प्रकार आहे!
भारतातील श्रीमंती म्हणजे अभ्यास न करता कॉपी करून पास झाल्याचा प्रकार आहे!
आपल्या देशातील श्रीमंती म्हणजे अभ्यास न करता कॉपी करून पास झाल्याचा प्रकार आहे. अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतात; त्यामुळे अपवाद असणारांनी वाईट वाटून घेऊ नये. जगात श्रीमंत होण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे जे विधायक मार्गाने परिश्रम करतात आणि त्यांच्या परिश्रमाचा देशाच्या प्रगतीसाठी, जगाच्या कल्याणासाठी उपयोग होतो.
त्याचप्रमाणे जगात गरीब राहण्याचा त्यांनाच अधिकार आहे जे आळशी असतात, परिश्रम करत नाही अथवा परिश्रम केले तरी ते परिश्रम देशाच्या प्रगतीसाठी, जगाच्या कल्याणासाठी विघातक असतात. आपल्या देशात अप्रामाणिक व अनैतिक मार्गाने श्रीमंत होणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. त्या मानाने प्रामाणिक व नैतिक मार्गाने श्रीमंत होणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. काही उदाहरणे पाहूया:
- गले लठ्ठ मानधन असतानाही बहुतांश लोकप्रतिनिधी म्हणजेच सरपंचापासून तर आमदार, खासदार, मंत्री प्रत्येक विकास कामांमध्ये गडगंज कमिशन खातात म्हणजेच भ्रष्टाचार करतात आणि श्रीमंत होतात.
- सरकारी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पगार असूनही बहुतांश अधिकारी लाच खातात म्हणजेच भ्रष्टाचार करतात आणि श्रीमंत होतात.
- बहुतांश डॉक्टर लोक रुग्णाला प्रामाणिकपणे उपचार न देता त्याच्याकडून जास्तीत जास्त पैसा कसा उकळता येईल या हिशोबाने त्याला उपचार देतात म्हणजेच भ्रष्ट मार्गाने श्रीमंत होतात.
- बहुतांश मोठमोठे उद्योजक कंत्राटी कामगारांना अत्यल्प वेतनावर राबवून घेतात व स्वतः नफा कमावतात; म्हणजेच गोरगरीब कष्टकऱ्यांच्या शोषलेल्या रक्तावर भ्रष्ट मार्गाने हे श्रीमंत होतात.
- बहुतांश व्यापारी लोक साठेबाजी करून अत्यल्प दरात शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेतात व स्वतः चढ्या दराने शेतमाल विकून भ्रष्ट मार्गाने श्रीमंत होतात.
- न्यायव्यवस्थेत बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांपासून तर अगदी तहसीलदार, प्रांत, वकील तसेच अन्य तत्सम संबंधित अधिकारी वादी व प्रतिवादी यांच्याकडून अनैतिक मार्गाने मोठ्या प्रमाणावर पैसे उकळतात व भ्रष्ट मार्गाने श्रीमंत होतात.
- सर्व जरी नसले तरी बरेच शिक्षक लोक वर्गात व्यवस्थित न शिकवता स्वतःचे खासगी क्लासेस घेतात व भ्रष्ट मार्गाने पैसा कमवून श्रीमंत होतात.
आपल्या देशात बौद्धिक कामाला खूपच प्रतिष्ठा मिळालेली आहे. त्यामानाने शारीरिक परिश्रमांना खूपच हीन लेखलं गेलेलं आहे. बौद्धिक परिश्रमाच्या नावाखाली बहुतांश लोक कोणतेही विशेष न काम करताही मोठ्या प्रमाणावर पैसा कमावतात. या उलट शारीरिक कष्ट करणारे कष्ट करून करून अक्षरशः खंगून जातात. खरंतर त्यांच्या कष्टावर जग चालतं. तरीदेखील त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला अत्यंत कमी मिळतो व हीन वागणूक मिळते.
अशी मानवतेला काळीमा फासणारी अमानवी व्यवस्था आपल्या देशात विकसित झालेली आहे. हेच गरिबीचे मूळ आहे.
– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home