जुनी घरे विरुद्ध आधुनिक बांधकाम – पर्यावरण आणि आरोग्याचा विचार
जुनी घरे विरुद्ध आधुनिक बांधकाम – पर्यावरण आणि आरोग्याचा विचार
जुन्या काळात घरे साधी असली तरी पर्यावरणपूरक होती. मातीच्या भिंती, ऊसाच्या पाचटाचे छप्पर. त्याला आधारासाठी किरळांच्या झावळ्या, लिंबा-बाभळीच्या मेडी, भिंतींना पांढऱ्या मातीचा गिलावा, जमीन गायीच्या शेणाने सारवलेली. हे सर्व साधं असलं तरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होतं. त्यामध्ये निसर्गाचा कुठेही ऱ्हास होत नव्हता.
मात्र आज सगळीकडे टोलेजंग इमारती दिसत असल्या तरी त्या पर्यावरणपूरक नाहीत. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाला. परिणामी पाणी नैसर्गिकरित्या गाळले जात नाही. ते पाणी पिण्यायोग्य आणि शेतीच्या पिकायोग्य देखील राहिलेले नाही. दगडांसाठी प्रचंड खोदकाम केले गेले. अनेक ठिकाणी पर्वत, डोंगर, टेकड्या अस्ताव्यस्त केले गेले. ही प्रगती नसून आत्मघात आहे.
पैशाच्या हव्यासाने लोकांनी बागायती जमिनी विकल्या. प्रगतीच्या नावाखाली तेथे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. तथाकथित प्रगतीच्या मृगजळा मागे धावून मनुष्य स्वतःचा विध्वंस करून घेत आहे. जंगले नाहीशी झाल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करू लागली आहेत. अर्थातच त्यांचा माणसाला उपद्रव होऊ लागलेला आहे. पण तो दोष त्या वन्य प्राण्यांचा नसून माणसाचा आहे.
शिवाय जुन्या पद्धतीची घरे आर्थिक दृष्ट्या परवडणारी आणि सहजासहजी बांधता येणारी होती. आज बंगला बांधण्याच्या नादात बऱ्याच लोकांचे पूर्ण जीवनच त्याचे हप्ते फेडण्यात जाते. प्रत्येक पिढीला स्वतःचे घर बांधण्यासाठी संधी मिळायलाच हवी. त्यासाठी आधीच्या पिढ्यांनी एवढी उठा ठेव करण्याची गरज नाही. काही ठराविक क्षेत्रात सिमेंट-काँक्रीटची भक्कम बांधकामे आवश्यक आहेतच. पण याचा अर्थ सर्वांनीच भक्कम बंगले बांधून राहायला पाहिजे असाही होत नाही. बंगल्या मधील फरश्यांमुळे देखील काही आजार निर्माण होतात.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home