गरीबी, श्रीमंती व कर्तृत्व
गरीबी, श्रीमंती व कर्तृत्व
सच्च्या देशसेवेला न्याय देणारी आदर्श अर्थ वितरण प्रणाली हाच गरिबी हटवण्याचा एकमेव उपाय आहे.
देशातील गरिबी व श्रीमंती माणसाच्या कर्तृत्वाशी संबंधित नसून सदोष अर्थ वितरण प्रणालीशी संबंधित आहे हे स्पष्ट आहे. मुळात पैसा ही निसर्गनिर्मित वस्तू नसून मानवनिर्मित वस्तू आहे. पैसा हे फक्त विनियोगाचे साधन आहे. माणसा-माणसांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण सुलभ करण्याचे ते फक्त एक साधन आहे ही गोष्ट कधीही विसरता कामा नये. पैसा हे जीवन जगण्याचे माध्यम आहे, साधन नाही. पैशांच्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार हेच भ्रष्टाचाराचे मूळ असून भ्रष्टाचारामुळेच गरिबी व श्रीमंतीचा उदय झाला आहे.
आज देशात खरे देशसेवक उपाशी आणि देशद्रोही तुपाशी अशी जी माणुसकीला काळीमा फासणारी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला कारण हा पैसाच आहे. माणसाचे कर्तृत्व पैशात मोजले जावे याच्यासारखी नीच गोष्ट दुसरी कोणतीही नाही. मुळात पैसा हा कर्तृत्वात मोजला जायला हवा; पण तसे होत नाही. ज्यांचे काम खरी देशसेवा आहे, ज्यांच्या कामाचा देशाला उपयोग होतो, ज्यांच्या कामामुळे देशाची प्रगती होते, ज्यांच्या कामात खऱ्या अर्थाने शरीर व बुद्धी यांचा कस लागतो — तेच खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान असतात व अशा कर्तृत्ववानांनाच जास्तीत जास्त पैसा मिळायला हवा. त्यासाठी अनुकूल अशी आदर्श अर्थ वितरण प्रणाली विकसित व्हावी हीच आमची प्रमुख मागणी आहे.
ही प्रणाली लागू करण्याचे टप्पे:
- पैशांच्या स्वरूपात होणारे आर्थिक व्यवहार पूर्णतः बंद करण्यात यावेत. सर्व आर्थिक व्यवहार फक्त ऑनलाईन किंवा चेकच्या स्वरूपात करण्यात यावेत.
- सरकारकडून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्याचा अभ्यास (Account Study) करण्यात यावा.
- प्रत्येक नागरिकाची मासिक सरासरी मिळकत जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती याचा अभ्यास करण्यात यावा.
- प्रत्येक नागरिकाला दरमहा कमीत कमी व जास्तीत जास्त किती रुपये मिळायला हवेत याची मर्यादा ठरवण्यात यावी.
- ज्यांचे मासिक आर्थिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांची अतिरिक्त रक्कम सरकारने जमा करून, ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी.
अशी प्रणाली लागू झाल्यास देशातील गरिबी दूर होईल आणि प्रत्येक नागरिक सुखी व समृद्ध बनेल. गरीबी दूर करण्याचा हाच एकमेव रामबाण उपाय आहे; कारण श्रीमंती म्हणजे कर्तृत्वसंपन्नता नाही आणि गरिबी म्हणजे कर्तृत्वशून्यता नाही — तर तो फक्त सदोष अर्थ वितरण प्रणालीचा परिणाम आहे.
– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ
Labels: गरीबी निर्मुलन
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home